आठवतय का मिञांनो!लाल चिखल!आणी टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांची आजची अवस्था!

आठवतय का मिञांनो!लाल चिखल!आणी टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांची आजची अवस्था!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

प्रा.भास्कर चंदनशीव यांची लाल चिखल ही इयत्ता ९ वी च्या मराठीच्या पुस्तकातील कथा.या कथेतील अवस्था आज शेतकरी वर्गाची झाली आहे.या कथेतील थोडासा महत्वाचा भाग तुमच्यासाठी!

सांगणं आठ आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं?’
आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं बघता बघता तापली. व्हट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं इच्यारलं.
‘पावनं, किती घ्यायचीत?’
‘सिस्ताईनं सांगितलं, तर पावशेर घेतली आस्ती…’
असं मनून त्यानं चार-दोन मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली. आन् पिसवी धरीत त्ये गिर्‍हाईक बोललं.
‘चार आणे किलोनं धरा…’
‘काय?’
आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. सम्दं आंगच थरारलं. आन् कडाड्कन आबा गरजलं…
‘ये हायवानाऽ जिभीला हाड बसवून घे! चल ऊठ, पळ हितून…’
तसं त्यो माणूस तट्कन उठला. आन् काईतरी बुटबुटत म्हागं सरकत निघून गेला…
आबा भुसा भरल्यागत ताठच्या ताठच उभं व्हतं. चेहरा तापला व्हता. आन् डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या व्हत्या.
‘…चार आणे किलो… ईस पैस्या किलो… धा पैस्या, पाच पैस्या… आरं फुकट घ्या की मनावं…’
आन् एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचविल्या. लालेलाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या गुडघ्याएवढा रसरसीत ढीग झाला. आन् आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचाकचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला.
आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच व्हता.’

आपल्या श्रमाची, घामाची कवडीमोलाने खरेदी होणे आबाला पसंत नाही. भले त्याचा मातीवर जीव असेल, शेतीवर प्रेम असेल, रक्त आटवून, घाम गाळून आपल्या कुटुंबाला पोसायची तयारी असेल….पण याचा अर्थ कुणीही आपल्या कष्टाची अशी खुलेआम खिल्ली उडवावी, ही गोष्ट त्याच्या शांत व्यक्तिमत्वातील ‘विद्रोहाच्या पाण्याला’ जागे करते. तो अंतर्बाह्य पेटून उठतो. आणि ‘पडेल भावात माल विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याचे क्रांतिकारी पाऊल’ उचलतो.
आज अशीच राज्यातील अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे आणी त्याचा प्रत्यय म्हणुन अनेक जिल्हातील टोमाॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी रस्त्यावर ओतून दिलेले टोमाॅटोचे ढिगाचे व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.आणी तरी सुद्धा किरकोळ बाजारात गेल्यावर १० रूपये पावशेर भावाने व्यापारी टोमॅटोची विक्री करत आहेत.