आदिवासी भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी तत्काळ आर्थिक सहाय्य करा : खा.डॉ. अमोल कोल्हे

आदिवासी भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी तत्काळ आर्थिक मदत करा : खा.डॉ. अमोल कोल्हे

– पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पत्राद्वारे केली मागणी

राजगुरुनगर, दि.१७ (प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील आदिवासी भागातील भिवेगाव, भोरगिरीसह तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावातील पडलेल्या घरांची दुरुस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यासाठी तत्काळ आर्थिक सहाय्य करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

चक्रीवादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांचे लक्ष वेधले. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याची बाब खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली आहे.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर यंदा पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाने खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचे जनजीवन विस्कळित केले आहे. आधीच कोविड १९ च्या संकटामुळे नोकऱ्यांवर गदा आली आहे. सर्वच प्रकारचे व्यवहार आणि व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने त्यांचे जीवन अधिकच खडतर झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हालचाल करून त्यांची घरे दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे, असे खा.कोल्हे यांनी सांगितले.