उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंचर पोलीस ठाण्यासह खेड तालुक्यातील विकास कामांचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंचर पोलीस ठाण्यासह खेड तालुक्यातील विकास कामांचा आढावा

विशेष प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

मंचर पोलीस ठाणे आणि खेड राजगुरूनगर येथील प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे आदी विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला.

मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाणे तसेच खेड तालुक्यातील राजगुरूनगर प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, निमगाव खंडोबा मंदिर येथे रज्जू हवाई मार्ग (रोप वे) तसेच रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. खेड प्रशासकीय इमारतीसाठीच्या जागेबाबतची तांत्रिक अडचण त्वरित सोडवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रशासकीय इमारत आणि पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या आराखड्यांचे सविस्तर संगणकीय सादरीकरण वास्तुविशारदांनी केले.

श्री. पवार म्हणाले, इमारती दर्शनीय दृष्टीकोनातून सुंदर आणि नागरिकांना आपल्या कामांच्यादृष्टीने आश्वासक वाटली पाहिजे. सर्व इमारतींमध्ये भरपूर हवा खेळती राहण्यासह नैसर्गिक प्रकाशव्यवस्था असावी. संपूर्ण इमारतीची विजेची गरज सौरऊर्जेद्वारे भागली पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करावे. उद्वाहकांची व्यवस्था असली तरी प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांची जास्त ये- जा असणारी प्रांत, तहसील, दुय्यय निबंधक, भूमी अभिलेख आदी कार्यालये पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर ठेवावीत जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांना मजले चढण्याचा त्रास होता कामा नये.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.