एमआयडीसीत सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्याची चाचपणी करा : खा.डॉ.अमोल कोल्हे यांची खेड तालुका प्रशासनाला सूचना

एमआयडीसीत सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्याची चाचपणी करा : खा.डॉ.अमोल कोल्हे यांची खेड तालुका प्रशासनाला सूचना

चाकण,दि.२० (प्रतिनिधी)
शिरूर लोकसभा मतदारसंघातील एमआयडीसीतील कंपन्यांशी संपर्क साधून सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारणी करता येईल का? तसेच म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरचे जम्बो हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्याबाबत तातडीने चाचपणी करा. त्याचबरोबर खेड तालुक्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड, रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची अस्वस्थता लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलावलेली तालुक्याची कोविड आढावा झूम बैठक पार पडली. यावेळी विविध अडचणींवर चर्चेदरम्यान सूचना दिल्या.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीनुसार खेडचे प्रांताधिकारी श्री. विक्रांत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या झूम बैठकीला तहसीलदार श्रीमती वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी श्री. अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काकणे यांच्यासह आरोग्य, पोलीस व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता तालुक्यातील नागरिकांना तत्काळ कळावी यासाठी तयार केलेल्या डॅशबोर्ड व हेल्पलाईनची स्वतः चाचणी घेतली. चाचणी दरम्यान मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रशासनाचे कौतुकही केले. त्याचबरोबर रेमडिसिविर इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळण्याबरोबर त्याची उपलब्धता करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

चाकण एमआयडीसीमुळे खेड तालुक्यात लोकसंख्या वाढली असून कामगार वर्ग विशेषतः मजुरांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘सुपर स्प्रेडर’ रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांना होम आयसोलेशन मधील नागरिकांनी बाहेर फिरू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांवर रेमडिसिविर इंजेक्शन आणण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यासाठी भरारी पथके तयार करुन उपचाराच्या बिलांसह सर्व बाबींची नियमित तपासणी करण्याची सूचना प्रांताधिकारी श्री. विक्रांत चव्हाण यांना केली. त्याचबरोबर चांडोली ग्रामीण रुग्णालयात तंत्रज्ञांअभावी पडून असलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यासंदर्भात जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करा, म्हणजे रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा मिळण्यातील अडचणी दूर होतील, असा विश्वास खा. कोल्हे यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्याचा कोविड रुग्णांचा वाढता आलेख रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. त्यासाठी काही जिल्हा प्रशासनाकडून काही मदत लागल्यास मला तत्काळ संपर्क साधावा. तालुक्यातील जनतेला कोणत्याही प्रकारे असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांच्या आकडेवारीसह दैनंदिन माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी ऑनलाइन बैठकीत दिले.