कळमोडीच्या पाण्यासाठी अशोक टाव्हरे यांचे आझाद मैदान येथे सहकार्‍या सोबत उपोषण.

कळमोडीच्या पाण्यासाठी अशोक टाव्हरे यांचे आझाद मैदान येथे सहकार्‍या सोबत उपोषण.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्याच्या पुर्व भागातील व थिटेवाडी बंधारा लाभक्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण होऊनही कळमोडी उपसा योजनेसाठी अंतिम मान्यता शासनाने नाकारल्यामुळे आज दि.७/९/२०२१ पासून आझाद मैदान मुंबई येथे कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोक टाव्हरे,उपाध्यक्ष राजु खंडीझोड, सचिव सुभाष गोरडे ,खजिनदार रामदास दौंडकर,शंकरराव सोनवणे,शहाजी सोनावणे यांनी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे .कळमोडी उपसा योजनेसाठी सर्वेक्षणाचे गाजर दाखवून शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि.२/२/२०१७ मधील मुद्दा क्रमांक १.९ नुसार बारा गावे वगळली असे भामा आसखेड धरण विभागाने लेखी कळविले आहे.वाढीव गावांसाठी वाढीव पाणी ,तसेच वाढीव क्षेत्र १०% पेक्षा जास्त असेल तर जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता याबाबत शासन व लोकप्रतिनिधींकडून कार्यवाही झाली नाही,त्यामुळे शासनाने कळमोडी उपसा योजनेबाबत सदर गावांना तातडीने न्याय दिला नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे या योजनेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे अशोक टाव्हरे यांनी आंदोलन वेळी सांगितले.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील १६२५ हेक्टर व सातगाव पठार भागातील ३४४० हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडी उपसा योजना शासनाने १९९७ साली प्रस्तावित केली होती.नंतर खेड तालुक्याच्या पुर्व भागातील ८४३ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण झाले.जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थिटेवाडीपर्यंत २००० हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले व दोन वर्षात पाणी येईल अशी घोषणा केली होती.
तसेच कळमोडी योजनेसाठी कळमोडी धरणाचे ०.८७टीएमसी पाणी व चासकमान धरणासाठी १.०७टीएमसी पाणी राखीव आहे.वाढीव क्षेत्राला वाढीव पाणी लागणार,याबाबत दि.२८/२/२०१९ रोजी पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाने अशोक टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांना पाठविलेल्या अहवालात चास कमान धरणासाठी राखीव ठेवलेले पाणी देता येणार नाही तसेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता घ्यावी लागेल असे नमूद केले होते.
अतिरिक्त क्षेत्राबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दि.१९/८/१९ रोजी शासनास प्रस्ताव पाठविला होता,परंतु दि.४/२/२०२० रोजी मंजुरी शासन निर्णय, जलसंपदा विभाग क्र.सिंचन २०१५/प्र.क्र.२४/२०१५/जसं(धोरण)दि.२/२/२०१७ मधील मुद्दा क्र.१.९ नुसार नाकारली आहे असे भामा आसखेड धरण विभागाने दि.५/८/२०२१ रोजी अशोक टाव्हरे यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने २०१८ मध्ये पाच दिवस आझाद मैदानात आंदोलन केले होते.वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला.जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही तक्रार केली होती.
परंतु शासनाने अतिरिक्त क्षेत्राची मान्यताच नाकारली आहे.सातगाव पठारपर्यंतच्याच गावांचा सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील लाभक्षेत्र बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे सिंचित करणे व उर्वरित सर्व टप्पे पुर्ण करून पाणी वेळ नदीमध्ये सोडून सातगाव पठार भागातील लाभक्षेत्र हे को.प.बंधाऱ्याद्वारे सिंचनाखाली आणणे अशी तरतुद अहवालात असल्याने कळमोडी उपसा योजनेचे पाणी खेड तालुक्याच्या पुर्व भागाला व थिटेवाडीपर्यंतच्या गावांना कसे मिळणार? सर्वेक्षण केले,अनेक वर्षे या भागातील नागरिक आस लावून होते.यंदा पाऊस कमी असल्याने पाणीटंचाईची समस्या आताच भेडसावत आहे.शासनाने जलसंपत्ती प्राधिकरण मान्यता व वाढीव पाण्यासाठी अनुकूल भुमिका घेऊन या अवर्षण ग्रस्त भागाला न्याय द्यावा यासाठी कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.