कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

पुणे: प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात आठ गाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात, आमदार अतुलजी बेनके, आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष सचिन बोगवत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, गणेश थोरात श्रीराज भरणे, अनिकेत भरणे, अक्षय भरणे आदी उपस्थित होते.
एक हजार पाचशे साड्या, दोन हजार ब्लँकेट, एक हजार पाचशे टॉवेल, लहान मोठ्या मुली आणि मुलांसाठी प्रत्येकी पाचशे कपडे, पाण्याचे एक हजार बॉक्स, पाचशे बिस्किटांचे बॉक्स, इतर खाद्यपदार्थांचे ऐंशी बॉक्स, गहू आठशे किलो, तांदूळ एक हजार किलो, साखर आणि मसाला प्रत्येकी तीनशे किलो मदत रवाना करण्यात आली.
यावेळी निर्मलाताई पानसरे म्हणाल्या की, सध्यस्थितीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशावेळी तेथील लोकांना मदतीची गरज आहे त्यामुळे भरणे प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असलेली मदत मोलाची आहे अशाच प्रकारची मदत समाजातील संस्था संघटना आणि दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहनही पानसरे यांनी केले.