खा.डॉ.अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्कार प्रदान.

खा.डॉ.अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्कार प्रदान

नवी दिल्लीत संपन्न झाला शानदार सोहळा ; निवृत्त न्यायमूर्ती ए.के.पटनायक यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

दिल्ली, दि.२० (प्रतिनिधी) : देशातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिसेन्स इ – मॅगेझीनतर्फे देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना आज नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.के.पटनायक आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नवी दिल्लीतील काॅन्स्टिट्यूशन क्लब येथे निवड समितीचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, प्राइम पाॅइंट फाउंडेशनचे अध्यक्ष के.श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. गेल्या १२ वर्षांपासून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाउंडेशनतर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. संसदेतील अधिवेशनातील खासदारांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खा.डॉ.कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.

चालू सतराव्या लोकसभेत खा.डॉ.कोल्हे यांनी लोकसभेच्या सभागृहातील १४ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी आतापर्यंत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसह लोकोपयोगी विषयांवर एकूण २७७ प्रश्न उपस्थित केले. अल्पावधीतच खा.कोल्हे यांनी संसदेत उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रभावी भाषणांद्वारे छाप पाडत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक रेल्वे, बैलगाडा शर्यत, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राच्या मुद्द्यांसह अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदेत आवाज उठविला. त्यांची गेल्या दोन वर्षांमधील संसदेतील कामगिरी विचारात घेऊन देशपातळीवर प्रतिष्ठीत असा संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर खा.डॉ.कोल्हे म्हणाले, “माझ्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच मानाचा संसद रत्न पुरस्कार मिळाला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा महान विभूतींच्या विचारांचा वारसा माझ्यासमोर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आशीर्वाद पाठिशी आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन लाभत असते. तसेच राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय आमदार व लोकप्रतिनिधी आणि संसदेतील ज्येष्ठ सहकाऱ्यांची खंबीर साथ मिळाली.

*पुरस्कार मायबाप मतदारांना अर्पण*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरीकाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची जाणीव यामुळे हे शक्य होऊ शकलं. कारण आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे. म्हणूनच हा संसदरत्न पुरस्कार आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदार बंधू भगिनींना अतिशय नम्रपणे अर्पण करतो.”
—————————————————-