खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पीएमआरडीए आरक्षण जनजागृती मेळाव्याचे आयोजन

खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पीएमआरडीए आरक्षण जनजागृती मेळाव्याचे आयोजन

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

पीएमआरडीएने जाहीर केलेला विकास आराखड्याच्या चुकीच्या गोष्टी जनतेला लक्षात आणून देण्यासाठी खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनजागृती मेळावा आयोजित केला आहे. येत्या गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) चांडोली येथील पुणे नाशिक महामार्गावरील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाजवळील खेड तालुका भाजप जनसंपर्क कार्यालयात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी सांगितले.

या मेळाव्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व संजय भेगडे यांच्यासह आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खांडरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. खेड तालुक्यात १२ गावांमधून पूर्व चक्राकार रिंगरोड, ८ गावांमधून बुलेट ट्रेन तर २२ गावांमधून हायस्पीड रेल्वे प्रस्तावित आहे. यासाठी प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या जमीन अधिग्रहण प्रश्नांसंदर्भात जनतेत तीव्र नाराजी आहे. त्यातच भर म्हणून पीएमआरडीएने खेड तालुक्यातील ११४ गावांमध्ये आरक्षण व विविध प्रकारचे झोन प्रास्तवित केले आहे. त्यामुळे काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत तर अनेक शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत. यामुळे हतबल झालेल्या जनतेला दिशा देण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याची माहिती भोसले यांनी दिली.

या मेळाव्यात विकास आराखडा नक्की कसा आहे व त्यावर हरकत कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच हरकतीचा मसुदा अर्ज व नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भोसले यांनी केले आहे.