चाकण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे कोविड आरोग्य केंद्र होणार सुरू : खा.डॉ.अमोल कोल्हे

चाकण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे कोविड आरोग्य केंद्र होणार सुरू : खा.डॉ.अमोल कोल्हे


चाकण,दि.१२ (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाकण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे ‘स्वतंत्र कोविड आरोग्य केंद्र’ (Dadicated Covid Health Centre – DCHC) सुरू करण्याची मागणी मान्य झाली असून लवकरच हे केंद्र लोकांच्या सेवेत कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

चाकण बाजारपेठेचं शहर म्हणून ओळखले जाते. परंतु दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी कोविड रुग्णांचा संपूर्ण भार चांडोली ग्रामीण रुग्णालयावर पडत होता. त्यामुळे कोविड रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयातच ‘स्वतंत्र कोविड आरोग्य केंद्र’ सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार चाकण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड आणि १० नॉनकोविड बेडचे स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती देताना खा.कोल्हे म्हणाले, सध्या चाकण ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन ओपीडीसह इतर विभाग सुरू आहेत. चांडोलीचे ग्रामीण रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी राखून ठेवले आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचा भार चाकण ग्रामीण रुग्णालयावर आला आहे. याठिकाणी नॉनकोविड १० बेडही वाढविण्यात आले आहेत. या स्वतंत्र कोविड आरोग्य केंद्रासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारीका आणि अन्य कर्मचारी वर्ग उपलब्ध होताच लोकांच्या सेवेत हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या डॉ. नितीन बिलोलीकर यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार आहेत. या केंद्रासाठी आवश्यक स्वतंत्र डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत लोकांच्या सेवेत हे कोविड आरोग्य केंद्र सुरू होईल, असा विश्वास खा.कोल्हे यांनी व्यक्त केला.
——————————–