चाकण- तळेगाव चौकातील ट्रॅफीक समस्या जाणून घेण्यासाठी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांचा नागरिकांशी संवाद!

चाकण- तळेगाव चौकातील ट्रॅफीक समस्या जाणून घेण्यासाठी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांचा नागरिकांशी संवाद!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

 

खेड तालुक्यातील सर्वांत ज्वलंत प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे
“चाकण-तळेगाव चौक आणि मुख्य रस्त्याची ट्रॅफिक.” या ट्रॅफिक समस्येचा जितका त्रास या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या तुम्हा-आम्हा सर्वसामान्य प्रवाशाला होतो; त्यापेक्षा कैक पटीने अधिकचा त्रास येथील स्थानिक नागरिक गेली कित्येक वर्षे सहन करत आहेत.

कित्येक वेळेस रुग्णांचे जीव वाचवणारी रुग्णवाहिका असो वा एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर अतिशीग्र वेळात घटनास्थळी दाखल होऊन होणारे नुकसान कमी करणारी अग्निशामक दलाची गाडी असो; या सुद्धा भरपूर वेळा या चाकण-तळेगाव चौकातील ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकलेल्या आपण पहिल्या आहेत. या ट्रॅफिकच्या समस्येमुळे येथील स्थानिक नागरिकांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी उभ्या केलेल्या व्यावसायिक मालमत्तेकडे व्यावसायिकांनी देखील पाठ फिरवली आहे.

या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाणेकरवाडी या ठिकाणी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी खराबवाडी ते कडाचीवाडी दरम्यान २ पर्यायी मार्गांचा प्रस्थाव सादर केला. पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब आणि आमदार मा.श्री.दिलीपशेठ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पर्यायी रस्त्याची मागणी प्रशासनाकडे मांडणे आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात भविष्यात होणाऱ्या विकासकामांचा विचार करून सदर ट्रॅफिक समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी सर्व बाधित गावांच्या स्थानिकांना सोबत घेऊन या संबंधीचे शिष्ठमंडळ लवकरचं संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेईल यासाठी मी निश्चितचं प्रयत्नशील राहील या बाबत उपस्थितांना आश्वस्त केले.

यावेळी नाणेकरवाडी गावचे विद्यमान सरपंच श्री संदेश साळवे, उपसरपंच श्री वासुदेवभाऊ नाणेकर, मा.सरपंच श्री शरदशेठ नाणेकर, मा.सरपंच श्री शशिकांत बापू नाणेकर, संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, गोपाळ जाधव, गोविंद जाधव, लिपीक श्री बाळासाहेब नाणेकर, ग्रामसेविका सौ इरणक मॅडम, दिपक नाणेकर, रुपेश नाणेकर, शिवाजी जाधव, नारायन नाणेकर आदी उपस्थित होते.