जैदवाडी जंक्शन स्थलांतरीत करा अन्यथा आंदोलन करेन : खा.डॉ.अमोल कोल्हे

जैदवाडी जंक्शन स्थलांतरीत करा अन्यथा आंदोलन करेन : खा.डॉ.अमोल कोल्हे

राजगुरुनगर, दि.७ (प्रतिनिधी)
गंभीर अपघाताला कारणीभूत ठरलेले जैदवाडी येथील युवराज हॉटेलसमोरील जंक्शन तत्काळ स्थलांतरित करा अन्यथा मला आंदोलन करावे लागेल असा इशारा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अखेर यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मान्य केले.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० चे चौपदरीकरण करताना जैदवाडी गावाकडे जाण्यासाठी युवराज हॉटेलसमोर क्रॉसिंग जंक्शन ठेवण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सदर जंक्शनला विरोध केला होता. ग्रामस्थांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या खेड घाट बायपास रस्त्याकडून तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांमुळे अपघात ब्लॅकस्पॉट होणार असल्याची कल्पना देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची सूचनाही केली होती.

दरम्यान नियमित होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन गतवर्षी डिसेंबरअखेर पासून खेड घाट बायपासचा पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वापर सुरू करण्यात आला होता. परिणामी तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांच्या गतीमुळे युवराज हॉटेलसमोरील जंक्शनजवळ अपघात होण्याच्या घटना घडल्या, त्यात जैदवाडी गावातील ३ तरुण मृत्युमुखी पडले होते. काल झालेल्या एका ४१ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. त्यांनी युवराज हॉटेलसमोरील जंक्शन बंद करून एसएनजी कॉलेजसमोरील दुभाजक तोडून जैदवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा केला. मात्र जंक्शन बंद करून एसएनजी कॉलेजसमोरील दुभाजक तोडल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पोलिसांत तक्रार नोंदवणार असल्याची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधला.

ग्रामस्थांच्या उद्रेकाची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी ग्रामस्थांवर गुन्हे नोंदवून प्रकरण अधिक चिघळेल असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच युवराज हॉटेलसमोरील जंक्शन बंद करून एसएनजी कॉलेजसमोर जैदवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्याची सूचना केली. तसेच रीतसर पत्र पाठवून तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी युवराज हॉटेलसमोरील जंक्शन बंद करण्याचे मान्य केले असून लवकरच एसएनजी कॉलेजसमोर जैदवाडी गावात जाण्यासाठी रस्ता खुला करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे मान्य केले.