बँकेची बदनामी भरून निघेल का?

बँकेची बदनामी भरून निघेल का?

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व अर्ध्या जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिक, शेतकरी व उद्योजिका महिलांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेच्या प्रचाराचा धुरळा शांत झाला आहे. रविवारी (ता.6) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. बँकेच्या निवडणुक प्रचारात प्रथमच एवढी रंगत आली, परंतु प्रचारात पातळी सोडून झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी अर्ध्या जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या आर्थिक संस्थेची बदनामी झाली, ही खरच खेड तालुकावासीय व बँकेच्या हितचिंतक सभासद, खातेदारांना भूषणावह आहे का? याचा विचार व्हायला हवा.

एखाद्या आर्थिक संस्थेच्या संचालकांची निवड म्हणजे आपली आयुष्यभरातील धनपुंजी विश्वासाने सांभाळ करणाऱ्या विश्वस्तांनी निवड. अन ही तर आपल्या बँकेची निवडणूक. पण यंदाच्या बँकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान अनेकांना बँकेबद्दलच्या या आपलेपणाचा विसर पडल्यासारखे वाटले. दोन पॅनेलमध्ये निवडणूकीची खरी लढाई आहे. बँकेच्या नावाच्या आड लपून एकमेकांवर चिखलफेक झाली. यातून बँकेचे नाव बदनाम होत आहे, याचा विसर पडल्याचे जाणवत आहे. भले निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणत्याही पॅनेलची सरशी होईल, परंतु बँकेची बदनामी भरून निघेल का? हा खरा मुद्दा आहे. ही निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. त्यात निर्णय चुकला तर थेट स्वतःचे अथवा आपल्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान सहसा होत नाही. पण बँकेची निवडणूक म्हणजे ही आपल्या पैशांचा सांभाळ करणाऱ्या विश्वस्तांची निवड आहे. ही निवड डोळे, कान, नाक उघडे ठेवून व मेंदूला चालना देऊन व्हायला हवी. पैसा, उच्च राहणीमान बघून नको तर सर्वसामान्य जनतेत मिसळणारे, आपल्या सुखदुःखात सहभागी होणारे, बँकेच्या माध्यमातून का होईना आपली गरज ओळखून मदत करणारे विश्वस्त निवडून दिले पाहिजे. परंतु यंदाच्या प्रचारात झालेली बँकेच्या नावाची बदनामी पाहता किती जण कामाला येथील, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. पैसा खर्च करून निवडून आलेले निवडणुकीत झालेला खर्च कोणत्या ना कोणत्या मार्गाने भरून काढण्याचा अथवा वसूल करण्याचा प्रयत्न करतील, असेच दिसत आहे. असे झाले तर तुम्हाआम्हाला भविष्यात पश्याताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. अजून आपल्या हातात वेळ आहे. हीच ती वेळ आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी सभासद मतदारांनी बँकेला प्रगतीपथावर नेणाऱ्या विश्वस्तांना निवडून देण्यासाठी सदविवेकबुद्धी जागृत ठेऊन मतदानाला सामोरे गेले पाहिजे.