बदलत्या काळातील बदलती आव्हाने पेलण्यासाठी तयार रहा- आमदार दिलीपराव मोहिते पाटील.

बदलत्या काळातील बदलती आव्हाने पेलण्यासाठी तयार रहा- आमदार दिलीपराव मोहिते पाटील.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

बदलत्या काळातील बदलती आव्हाने पेलण्यासाठी सोसायट्यांचे संचालक मंडळ सुद्धा सक्षम असले पाहिजे.’असे प्रतिपादन कडूस ता.खेड येथे विकास सोसायटीचा अमृत महोत्सव समारंभात जिल्हा बँकेचे संचालक व खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी अध्यक्षिय भाषणात केले.

‘विकास सोसायट्यांमधून आतापर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज मिळायचे. आता चार टक्के व्याज भरायला लागणार आहे. हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे परिपत्रक निघाले आहे. लाभांश न देण्याचे सुद्धा पत्र रिझर्व्ह बँकेने काढले आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण करण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. यावरून भाजप सरकारची शेतकऱ्यांबद्दलची पावले कशी आहेत ती ओळखा,’ असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी कडूस (ता.खेड) येथे शेतकऱ्यांना केले.

कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने यंदा 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शुक्रवारी (ता.27) कडूस येथे विकास सोसायटीचा अमृत महोत्सव समारंभ पार पडला. यावेळी अध्यक्ष थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक व खेडचे आमदार दिलीपराव मोहिते होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, अशोक शेंडे, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, प्रताप ढमाले, सरपंच निवृत्ती नेहेरे, सोसायटीचे अध्यक्ष पंडित मोढवे, चंद्रकांत पारधी, संचालक दामोदर बंदावणे, सुदाम ढमाले, साहेबराव धायबर, ज्ञानेश्वर ढमाले, अशोक गारगोटे, बाजीराव शिंदे, विमल कालेकर, संगीता अरगडे, सुशील जाधव, लक्ष्मण मुसळे, सचिव तात्यासाहेब कल्हाटकर, ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष थोरात यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी व सहकार विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी धावणाऱ्या जिल्हा बँका थेट आपल्या हातात घेण्याचे धोरण केंद्र सरकारचे असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. चेअरमन मोढवे यांनी प्रास्ताविकात सोसायटीचे 75 वर्षातील कालावधीचा आढावा मांडला. दरम्यान, थोरात व मोहिते यांच्या हस्ते सोसायटीच्या कोनशिलेचे अनावरण झाले. सर्व आजी-माजी अध्यक्ष व संचालकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले.