बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी जांभळांचा रानमेवा

बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी जांभळांचा रानमेवा

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

भारतीय संस्कृतीत शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दीर्घ शालेय सुट्टी संपवून आज शाळेची घंटा पुन्हा वाजली.पुन्हा एक़दा नव्याने शाळांमध्ये वर्ग भरले.नवे शैक्षणिक वर्ष, नवे ज्ञान
आणि नवीन अनुभूतिंच्या प्राप्तीसाठी आतूर विद्यार्थी आणि ज्ञानदानासाठी उत्सुक शिक्षक यांच्या साठी शाळेचा पहिला दिवस खूपच महत्वाचा मानला जातो.
बारापाटी कमान येथील शाळेत आज इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण करून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत दप्तरे, गुलाब पुष्प, तसेच रसदार जांभळांचा रानमेवा देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे.तिचे पावित्र्य जतन करतानाच उमलत्या बालमनावर उत्तमोत्तम संस्कार घडविणारी ही बारापाटीची जिल्हा परिषदेची शाळा तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली आहे.*जगात सर्वदूर केवळ ज्ञानीयांचाच सन्मान होतो आणि केवळ संस्कारक्षम शिक्षणानेच जीवनातील अज्ञानाचा अंधःकार दूर होतो व ज्ञानाच्या प्रकाशानेच जीवन उजळते.यावर या शाळेचा दृढ विश्वास आहे. प्रगतीची शिखरे गाठण्यासाठीचे मूलभूत ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःच्या क्षमतांविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.*
आजच्या शाळा पूर्व तयारी मेळावा आणि प्रवेशोत्सव समारंभासाठी शाळेच्या परिसरात सुंदर सुशोभीकरण करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर सहशिक्षिका वैशाली मुके यांनी आभार मानले.या समारंभाला कमान केंद्राचे केंद्र प्रमुख एकनाथ लांघी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साधना नाईकरे, कमान ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या अश्विनी नाईकरे,युवा नेते व उद्योजक नवनाथ नाईकरे,ज्येष्ठ नागरिक नथू सपाट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर नाईकरे, हिराबाई नाईकरे,सौ.सविता मुळूक,
अक्षदा नाईकरे आदी मान्यवर उपस्थित होते.