राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात- खेड तालुका ग्राहक हक्क समितीची मागणी!

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात- खेड तालुका ग्राहक हक्क समितीची मागणी!

राजगुरुनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात. अशी मागणी खेड तालुका ग्राहक हक्क समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
सन २०१९ मध्ये येथील नगरपरिषद सदस्यांची मुदत संपली आहे, अशी माहिती ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष रंगनाथ सुतार व सचिव विद्याधर साळवे यांनी दिली.
गावात बेसुमार वाढलेली अतिक्रमणे, गावकऱ्यांना पिण्यासाठी मिळणारे मैलामिश्रित अशुद्ध पाणी, वेळीअवेळी होणारा पाणीपुरवठा, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणयुक्त बांधकामे, नव्याने केलेल्या बांधकामांचा नोंदी न झाल्यामुळे बुडत असलेला नगरपरिषदेचा महसूल, तसेच नगरपरिषदेचे थकित असलेले महावितरणच्या विजपुरवठ्याचे सुमारे तीन कोटी रुपयांची वीज बिल न भरल्यामुळे वेळोवेळी दिवाबत्ती तसेच पाणी पुरवठ्याचा खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात पसरलेले कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव याशिवाय याच काळात तीन मुख्याधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या यामुळे गावात बजबजपुरी माजली असून कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे नागरिकांची कामे खोळंबलेली आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण त्वरित आदेश काढून राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात याव्यात. अशी मागणी पत्रकाद्वारे ग्राहक हक्क समितीने केली आहे. याप्रसंगी रवींद्र गुजराथी, प्रदीप कासवा, दीपक दीक्षित, माधव संभूस आदी उपस्थित होते.