रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी : खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्यसरकारकडे मागणी

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी : खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्यसरकारकडे मागणी

पुणे, दि.९ (प्रतिनिधी)
राज्यभरात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा झालेल्या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई भासवून काही वितरक इंजेक्शन्सचा काळा बाजार करत असून परिणामी गरजू नागरिकांची आर्थिक लूट आणि परवड होत आहे. हे रोखण्यासाठी राज्य सरकारने रेमेडिसिवीर इंजेक्शनची संपूर्ण वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, अशी मागणी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना  एका पत्राद्वारे केली आहे.

या संदर्भात खा.कोल्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडिसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात असल्यामुळे इंजेक्शनची प्रचंड मागणी वाढली आहे. रेमेडिसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्या थेट वितरकांंमार्फत वितरण करत आहेत. मात्र त्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे. याचा गैरफायदा घेत जादा दराने इंजेक्शन विक्रीचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तो रोखण्यासाठी तसेच गरजूंना रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत वितरणाची संपूर्ण जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी. जेणेकरून इंजेक्शन वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण प्रस्थापित होऊन इंजेक्शन उपलब्ध होतील. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ थांबेल यासोबतच जादा दराने विक्री व अनावश्यक साठा करणाऱ्यांना चाप बसेल. याबाबत राज्य सरकारने तातडीने रुग्णालयांमार्फत इंजेक्शनच्या मागणीनुसार वितरण करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

स्टेपडाऊन प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी

रुग्णालयांमध्ये मेडिक्लेम पॉलिसीमुळे स्टेपडाऊन प्रोटोकॉलची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विनाकारण बेड अडविले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडच्या व्यवस्थापनासाठी स्टेपडाऊन एसओपी तयार करावी. तसेच रुग्णांवर उपचार करताना रेमेडिसिवीर इंजेक्शन प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन होते आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके नेमावीत. एसओपीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सर्व रुग्णालयांना आदेश द्यावेत अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खा. डॉ. कोल्हे यांनी पत्राद्वारे केली आहे.