शिक्षिका शमा घोडके बनल्या जखमी विद्यार्थिनीच्या देवदूत!

शिक्षिका शमा घोडके बनल्या जखमी विद्यार्थिनीच्या देवदूत!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरसेवाडी ( ता. खेड) येथील शिक्षिका शमा घोडके मुथ्था या शाळेतील जखमी झालेल्या वैष्णवी बुरसे या विद्यार्थिनीच्या खऱ्या अर्थाने देवदूत झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी परिपाठ होण्याअगोदर सहावीत शिकणारी वैष्णवी बुरसे ही विद्यार्थिनी खेळताना उंचीवरून पडली .तिला नाजूक भागावर मोठी जखम झाली.घर जवळ असल्याने वैष्णवी आपल्या घरी गेली.मात्र जखम मोठी असल्याने रक्तस्राव होऊ लागला.वैष्णवीचे आई वडील आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी शाळेत संपर्क करून औषध उपचार व दवाखाना यासाठी मदत मागितली.
शाळेतील शिक्षिका शमा घोडके यांच्याकडे दुचाकी असल्याने त्यांनी तत्काळ वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैष्णवी हिला दाखल केले.मात्र जखम मोठी असल्याने तेथील डॉक्टरांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्याची सूचना दिली.शमा घोडके यांनी तत्काळ अँब्युलन्सशी संपर्क करून घोडेगाव येथून ती मागवली.मुलीच्या आईला सोबत घेऊन चांडोली येथे मुलीस नेले.मात्र तेथेही तपासणी करून मुलीवर उपचार न करता डॉक्टरांनी पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याची सूचना दिली.यात शमा घोडके आणि मुलीच्या आईची कसोटी लागली.हॉस्पिटलचा फारसा अनुभव नसताना त्यांनी मुलीस पिंपरी येथे नेले.तेथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचार करण्यास नकार दिला.यामुळे हतबल झालेल्या घोडके यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मुलीस दाखल केले.सायंकाळी सहा वाजता अखेर खूप तपासण्या आणि चौकशी करून मुलीस उपचार सुरू झाले.
मुलीच्या आईकडे पुरेसे पैसे नव्हते डॉक्टरांनी मुलीचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.त्यासाठी आवश्यक साहित्य आणि औषधे आणावी लागतील असे घोडके यांना सांगितले.क्षणाचा विलंब न करता त्यांनी स्वतः औषधे आणून दिली.मुलीचे ऑपरेशन झाले.रात्री बारा वाजेपर्यंत ससून हॉस्पिटलमध्ये त्या थांबल्या.रात्री मुलीचे वडील आल्यावर पुण्यात नातेवाईक यांच्याकडे शमा घोडके मुक्कामी गेल्या.
दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी ससून मध्ये जाऊन स्वतः जखमी मुलीची भेट घेतली.मुलीला धीर दिला.गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे,विस्तार अधिकारी ज्योती चीलेकर, श्री गोडसे ,केंद्रप्रमुख विजय सुरकुले,मुख्याध्यापक सुवर्णा गोईलकर तसेच ग्रामस्थ या सर्वांनी घोडके यांना आवश्यक मार्गदर्शन केले.मुलगी अजून ससून हॉस्पिटलमध्ये दाखल असून आता तिची प्रकृती सुधारत आहे .
अवघड प्रसंगी जखमी झालेल्या विद्यार्थिनीस योग्य उपचार मिळावेत यासाठी शिक्षिका शमा घोडके यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती खेड तसेच ग्रामपंचायत बुरसेवाडी ,ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे .